प्रति शेगाव घिर्णी गावाचा 14 तास तालुक्याशी संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

मलकापूर: मागील दोन दिवसांपासून म्हणजे 30 आणि 31 जुलै 2026 रोजी मलकापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार तालुका आणि शहरात जोरदार पावसाची नोंद झाली.

सलग पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या घरांमध्ये, शाळा, दुकाने, मेडिकल आणि गुरांच्या वाड्यांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.

शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने आणि वाहून गेल्याने मका, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आणि भाजीपाला पिके पाण्यात वाहून गेली.

मलकापूर शहरालगत असलेल्या प्रति शेगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घिर्णी गावाचा सुमारे 13 ते 14 तास शहराशी संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. संत गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरल्याने दर्शनासाठी अडचण निर्माण झाली होती. पाणी मंदिरापासून ते माजी सैनिक मोती सिंग शिसोदिया यांच्या घरापर्यंत पोहोचले होते.

पुराच्या पाण्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी ऑन ड्युटी गृह रक्षक कर्मचारी सचिन राजपूत यांनी स्वतः पाण्यात उतरून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच गावाचे पोलीस पाटील दिनकर मुकिंदा गव्हाळे यांनी पुराच्या पाण्याची पाहणी करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. घिर्णी ते माखनेर रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्यात वाहून गेल्याने हा मार्गही बंद आहे.

झालेल्या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले असून शासनाकडून तातडीने मदत आणि पंचनामे व्हावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!