फवारणीसाठी गेलेल्या युवकाचा पंपहाऊसच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदुरा तालुक्यातील घटना!

नांदुरा : तालुक्यातील जिगाव शिवारात फवारणीच्या कामादरम्यान २३ वर्षीय युवकाचा पंपहाऊसमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २५) घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृत युवकाचे नाव उमेश भानुदास तितरे (वय २३, रा. जिगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तितरे हे राहुल अनिल आडे यांच्यासोबत शेतात फवारणीच्या कामासाठी गेले होते. फवारणीसाठी आवश्यक पाणी आणण्यासाठी ते शेताजवळील पंपहाऊसकडे गेले. मात्र, बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने राहुल आडे यांनी त्यांचा शोध सुरू केला. पंपहाऊसजवळ पोहोचल्यानंतर उमेश यांच्या चपला आणि पाण्यावर तरंगणारा प्लास्टिकचा कॅन दिसून आला. संशय आल्याने पाण्यात पाहणी केली असता उमेश यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!