उधारीचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर काठीने हल्ला

खामगाव : उधारीचे पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून दोन जणांनी एका २६ वर्षीय तरुणाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना खामगाव तालुक्यातील अटाळी येथे घडली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अटाळी येथील बजरंग नजरुसिंग काळे (वय २६) हे २२ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलमा पुसद पवार याच्याकडे उधारीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. यावेळी पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर बलमा पवार याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, कॅनवल पुसद पवार हा देखील घटनास्थळी आला. त्याने बजरंग काळे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हातावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीच्या तक्रारीसह वैद्यकीय अहवालाच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी बलमा पुसद पवार व कॅनवल पुसद पवार या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!