अंढेरा : वैवाहिक वादातून मानसिक त्रास देऊन युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत अंढेरा पोलिसांनी पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अंढेरा येथील सूरज रामभाऊ तेजनकर यांनी २३ जुलै रोजी नातेवाइकाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृताची आई शशिकला तेजनकर यांच्या फिर्यादीवरून पत्नी वंदना सूरज तेजनकर आणि सतीश रामेश्वर काकडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ३(५) अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, पती-पत्नीमध्ये काही काळापासून मतभेद असून वंदना तेजनकर माहेरी राहत होती. तसेच तिचे सतीश काकडे यांच्याशी संबंध असल्याचा सूरज यांना संशय होता. या कारणावरून वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पत्नी घटस्फोटास सहमती देत नसल्याने आणि दोघांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने सूरज तणावात होते. या मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, अंढेरा पोलिस पुढील तपास करीत आहेत.