मलकापूर : तालुक्यातील दसरखेड येथील एका शेतातील विहिरीत २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल मधुकर नरोटे (वय २४, रा. दसरखेड) असे मृत युवकाचे नाव असून, एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नरोटे हा खासगी कंपनीत कार्यरत होता. १८ जुलै रोजी दुपारी तो घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेला होता. बराच शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याचा भाऊ चिंतामण नरोटे यांनी १९ जुलै रोजी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
याच दिवशी रात्री गावातील नागरिकांनी गोविंदराव डोसे यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख राहुल नरोटे अशी पटली. मृताच्या भावाने दिलेल्या जबाबात कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय टेकाडे पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.