शेगाव : फोन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोलावून एका युवकाला लोखंडी कड्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना १९ जुलै रोजी शेगाव शहरात घडली. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन विलास मदने (वय ३७, रा. जनकनगर, वरवट रोड, शेगाव) यांच्या तक्रारीवरून रुपेश कैलास कुंडलकर (वय २८) व हनुमान कैलास कुंडलकर (वय ३२, दोघेही रा. धनगरनगर, शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, रुपेश कुंडलकर याने फिर्यादीला फोन करून त्याचा भाऊ सोबत आहे का, अशी विचारणा केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्यास सांगितले. फिर्यादी तेथे पोहोचल्यानंतर दोन्ही आरोपी उपस्थित होते. यावेळी ‘तुझा भाऊ तुझ्याबरोबर असताना मला का बोलावले?’ असा जाब विचारताच रुपेश कुंडलकर याने शिवीगाळ करून हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर व डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ वार करून जखमी केले. त्यानंतर हनुमान कुंडलकर यानेही चापटा व बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.