मलकापूर : भरधाव वेगातील बोलेरो मालवाहू वाहनाने प्रथम दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर पुढे बैलगाडीलाही धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, बैलगाडीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचा डावा पाय निकामी झाला आहे. तसेच धडकेत बैलगाडीला जुंपलेला एक बैलही ठार झाला. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मलकापूर-बोदवड मार्गावरील टॉवर परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जांबुळधाबा येथील गजानन बाबुराव जवरे (वय ४४) हे एमएच-२८ बीएफ-६११० क्रमांकाच्या प्लॅटिना दुचाकीने मलकापूरहून जांबुळधाबाकडे जात होते. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या एमएच-२८ बीबी-९३४१ क्रमांकाच्या बोलेरो मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गजानन जवरे यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतरही बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर पुढे जात असलेल्या बैलगाडीलाही वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडीवरील धनराज माणिकराव बावस्कर (वय ५५, रा. जांबुळधाबा) गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो गुडघ्यापासून निकामी झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर मलकापूर येथील कोलते हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातात बैलगाडीला जुंपलेला एक बैलही जागीच ठार झाला. या प्रकरणी मधुसुदन पंजाबराव जवरे यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक शुभम दिनकर राणे (रा. हरणखेड, ता. मलकापूर) याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय सुरेश रोकडे करीत आहेत.