लाखनवाडा : गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या विश्वकर्मा ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहितीनुसार, २१ जून रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी मालक आले असता दुकानाचे मुख्य गेट तुटलेले आणि आतील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकानात प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप समोर आलेली नसली तरी प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.