Headlines

शेतात जाण्याच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांविरोधात गुन्हा

नांदुरा : शेतात ये-जा करण्याच्या मार्गाच्या वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर सारंगधर बोंबटकर (वय ५५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) यांची गट क्रमांक ८२२ मध्ये शेती आहे. या शेतात जाण्यासाठी ते सानपुडी गावाच्या मार्गाचा वापर करतात. मात्र, संबंधित मार्गावरून ये-जा करण्यास काही जणांकडून विरोध करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१८ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वडनेर शिवारातील गट क्रमांक ८२२ येथे मनोहर बोंबटकर शेतात असताना आरोपी तेथे आले. त्यांनी तक्रारदारास शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच यापुढे शेतात आल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी नांदुरा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!