मलकापूर : राज्य शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात आंदोलन करत स्वतःच्या शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळून निषेध व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून शासनाविरोधातील आंदोलन आता अधिक चर्चेचा विषय ठरले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत १८ जून रोजी वाघुळ शिवारातील काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत कन्हैय्या हॉटेलमागील शेतात आंदोलन केले होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान मुरलीधर भगत, सुनील बाबुराव संभारे, गोपाळ रायपुरे यांच्यासह अन्य ११ शेतकऱ्यांनी ढोल वाजवत व घोषणाबाजी करत स्वतःच्या शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या जाळून शासनाचा निषेध नोंदविला होता. या घटनेनंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मनोजकुमार उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ व १३७ अन्वये गुन्हा क्रमांक ४५९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.