खामगाव : ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत ग्राम बोरी शिवारातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते असा एकूण ३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांना बोरी शिवार परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजता पंचांसमक्ष छापा टाकला. कारवाईदरम्यान जुगार खेळताना आठ जण आढळून आले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितेश रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून गणेश गोपाळा खोडके, शेख रहेमान शेख चांद, अन्सार खान अफसर खान, शेख कासम शेख सत्तार, शेख रहीम शेख अमील मुल्लाजी, अजय मधुसूदन भट्टड, प्रवीण पद्माकर तळपते व रामेश्वर नारायण टिकार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींच्या अंगझडतीत ३ हजार ४८० रुपये रोख रक्कम जप्त केली. तसेच जुगाराच्या डावावर लावलेली ३२० रुपये नगदी रक्कम आणि ताशपत्त्यांचे दोन संच हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३ हजार ८५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, गुप्त माहितीच्या आधारे सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत, तर गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पोहेकॉ गोविंदा इंगळे यांनी केली.