देऊळगाव राजा :- तालुक्यातील आळंद फाटा येथे गणपती मंदिर परिसरात स्वच्छता करत असताना सर्पदंश झाल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानदेव मुक्ताराम जाधव (रा. मेहुनाराजा) हे रविवारी सकाळी मंदिर परिसरात साफसफाईचे काम करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक त्यांच्या हाताला सापाने दंश केला. सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. जाधव हे शांत व मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी इंदु उद्धव जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.