मलकापूर : – मागील वादाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे घडली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संघपाल मनोहर इंगळे (रा. बेलाड, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ते कामावर जात असताना आरोपी वैभव संभाजी हनुवते (रा. बेलाड) याने मागील वादाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत लाकडी दांड्याने डाव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच आरोपीने जवळील चाकू काढून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.