खामगाव : तालुक्यातील बोरीअडगाव येथे सुरू असलेल्या बांधकामस्थळी काम करताना पाय घसरून खाली पडल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मोहम्मदशहा उस्मानशहा (वय ४०) रा. कंचनपूर, ता. खामगाव, सध्या रा. शिक्षक कॉलनी, खामगाव असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक १९/२०२६ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मदशहा उस्मानशहा हे त्यांचे भाऊ अब्दुलशहा उस्मानशहा यांच्यासह बोरीअडगाव येथे एका घराच्या बांधकामस्थळी पेंटिंगचे काम करीत होते. दरम्यान, ८ मे रोजी पहाटे सुमारे २.४० वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्यावर काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ते खाली कोसळले. खाली पडताना जमिनीवर असलेल्या लोखंडी अँगलवर आदळल्याने अँगल त्यांच्या छातीत घुसली व त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी व नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालानुसार बांधकामस्थळावरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी अब्दुलशहा उस्मानशहा यांच्या तोंडी अहवालावरून तसेच अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेल्या आकस्मिक मृत्यू अहवालाच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.