Headlines

मलकापूर तालुक्यातील तरुणाचे लग्नाचे आमिष दाखवून जळगावच्या तरुणीवर अत्याचार; नंतर लग्नास नकार

मलकापूर : प्रेमसंबंधातून लग्नाचे आश्वासन देत तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव येथील २५ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋत्विक कडू कांबळे (वय २२, रा. कुंड खुर्द, ता. मलकापूर) हा फिर्यादी तरुणीच्या आत्याच्या मित्राचा मावसभाऊ असून दोघांची ओळख मोबाईलद्वारे झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, २५ मार्च २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत मलकापूर येथील मेदिनी आईस्क्रीम पार्लर, गोडे कॉम्प्लेक्स परिसर तसेच पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, नंतर आरोपीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे ५ मे २०२६ रोजी भारतीय दंड विधान कलम ३७६ (२)(ह), ३७६ (१) अन्वये ऑनलाइन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा ‘झिरो’ क्रमांकाने मलकापूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!