बुलढाणा : शहरातील विदर्भ हाउसींग सोसायटी परिसरात घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
फिर्यादी आसीफ खान अयुब खान पठाण (वय ३६, रा. विदर्भ हाउसींग सोसायटी, बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आपली काळ्या रंगाची होंडा शाइन (क्र. MH-28 BF-8157) ही दुचाकी घरासमोर पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल रोजी पहाटे नमाजसाठी बाहेर पडल्यावर त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु मोटारसायकलचा काहीच मागमूस लागला नाही. संशय आल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात व्यक्ती दुचाकी चोरी करून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. संबंधित फुटेज त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संजीव जाधव पुढील तपास करीत आहेत.