दोन कुटुंबांत मारहाण, परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल; अंढेरा येथील घटना!

अंढेरा :- अंढेरा येथे विवाहितेच्या आत्महत्येनंतर दोन कुटुंबांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारीची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला अधिकच रंग चढला.
माहितीनुसार, प्रभू चाटे व स्वाती डोंगरे यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. दोघेही मुंबईत वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
प्रभू चाटे यांच्या आई रंजना चाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ एप्रिल रोजी स्वातीच्या नातेवाईकांनी अंढेरा येथे येऊन प्रभू व त्याचा भाऊ विष्णू यांना शिवीगाळ करत चापटा, लाथाबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली. तसेच घरात घुसून गोंधळ घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, स्वातीच्या नातेवाईक दुर्गा डोंगरे यांनी वेगळी तक्रार देत प्रभू चाटे व त्याचा भाऊ विष्णू यांनीच त्यांच्यावर हल्ला करून दगडाने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
या परस्पर तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही बाजूंविरुद्ध मारहाण, घरात घुसखोरी, धमकी यांसारख्या गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!