शेगाव : तालुक्यातील नागझरी येथे एका ३० वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अरुण सरदार (वय ३०, रा. नागझरी ता. शेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी फिर्यादी शेवकराम नामदेव सरदार (वय ३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घरी असताना त्यांच्या भावाचा मोठ्याने आरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून ते बाहेर आले असता, सुनीलने घरातील एका खोलीत गळफास घेतल्याचे समजले. संबंधित खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने खिडकीतून पाहिले असता, सुनील हा लोखंडी अँगलला पट्ट्याच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. मात्र, सुनील याची कोणतीही हालचाल नसल्याने तो मृत अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस अधिक तपास करीत आहेत.