Headlines

३३५ स्प्रिंकलर तोट्या, मोटरपंप व केबल लंपास; शेतकऱ्यांचे ९० हजारांचे नुकसान

 

लोणार :- हिरडव, दाभा व जाफ्राबाद शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३३५ स्प्रिंकलरच्या तोट्या, मोटरपंप व केबल चोरी करून सुमारे ९० हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, परिसरातील सुमारे १८ ते २० शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व मूग पिकासाठी ३ एप्रिल रोजी सायंकाळी स्प्रिंकलर सुरू केले होते. हवामान खराब असल्याने शेतकरी पाहणी करून घरी परतले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतातून ३३५ स्प्रिंकलर तोट्या, ५ एचपी समर्सिबल मोटरपंप व ३०० फूट केबल चोरी केली.
शनिवारी सकाळी पोलीस पाटील रमेश तानाजी ओव्हर हे शेतात पाहणीसाठी गेले असता स्प्रिंकलरच्या तोट्या गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी इतर शेतकऱ्यांना माहिती दिल्यानंतर अनेकांच्या शेतातील साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले. या घटनेत रमेश ओव्हर, पांडुरंग मोरे, भानुदास राजगुरू, राम राजगुरू, विश्वास ओव्हर, अरुण ओव्हर, वैभव ओव्हर, प्रकाश मोरे, विजय घायाळ, संजय घायाळ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी रमेश तानाजी ओव्हर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणार पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम २०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!