Headlines

देशी बनावटीच्या पिस्तुलासह तिघे जेरबंद; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जामोद परिसरात मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे व मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद परिसरात काही इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर नजर ठेवली. योग्य वेळी कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पवन इंदरसिंग डावर (वय २३, रा. राजूर बु.), संजय भिल्लासिंग बोडले (वय २०, रा. राजूर बु.) आणि रमेश दुर्गासिंग बारेला (वय २४, रा. ईसलापूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), दोन जिवंत काडतुसे (२ हजार रुपये) तसेच एक मोटारसायकल (८० हजार रुपये) असा एकूण १,२२,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक व अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!