देऊळगाव राजा :- जालना रोड बायपास परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने महावितरणमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. निकेत सुरेश मिनासे (वय 42, रा. बालाजी मंदिराजवळ, देऊळगाव राजा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास मिनासे हे दुचाकीने जालना रोडवरून देऊळगाव राजा शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान, बायपासवरील एका वाईन बारजवळील परिसरात पाठीमागून वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मिनासे यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
