देऊळगाव राजा :- तालुक्यातील जवळखेड गावात मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जवळखेड येथील शेतकरी देविदास आश्रुबा गाटोळे (वय 44) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, 10 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी गावातील काही घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. देविदास गाटोळे यांच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले 10 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. त्यानंतर शांताबाई कुंडलिक गाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत ठेवलेले 40 हजार रुपये लंपास करण्यात आले. तसेच कांताबाई गणेश घोलप (रा. तढेगाव) यांच्या घरातील कापूस विक्रीतून मिळालेले 60 हजार रुपये पत्र्याच्या पेटीतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.