देऊळगाव राजा :- पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान एका कारमधून विनापरवाना धारदार गुप्ती आढळून आल्याने एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत सुमारे 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 9 मार्च रोजी सायंकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा मार्गावरील जनता सेवा जिनिंगसमोर करण्यात आली. पोलिस संशयित वाहनांची तपासणी करीत असताना एमएच 12 जीएफ- 8067 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये तलवारीसारखी धारदार गुप्ती आढळून आली. या प्रकरणी राहुल भास्कर झोरे (वय 33, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या गुप्तीची मुठ स्टीलची असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईदरम्यान अंदाजे 1 हजार रुपये किंमतीचे शस्त्र तसेच सुमारे 1 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण सुमारे 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.