दुसरबीड : बीबी येथे शिक्षकाच्या बंद घरात दिवसा घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला घरातच रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबी येथील रहिवासी तथा खापरखेड येथील शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत नंदाजी कांगणे हे ४ मार्च रोजी सकाळी शाळेत गेले होते. त्यांच्या पत्नी देखील गहू काढणीसाठी शेतात गेल्या होत्या. त्यामुळे घराला कुलूप लावलेले होते. दरम्यान दुपारी कांगणे हे शाळेतून परत येऊन शेतात गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास पती-पत्नी घरी परतले असता घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. घरात कोणीतरी असल्याचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरात लपून बसलेल्या आरोपीला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तेजस सुरेश वैद्य (वय ३०, रा. गणेश नगर, गारखेडा, संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. याबाबत सुर्यकांत कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीत घरातील कपाटातून ६ हजार रुपये रोख व ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. तसेच घरातील साहित्य व कागदपत्रे फाडून नुकसान केल्याचेही सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(१) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.