प्रेमप्रकरणातून मेहकर एमआयडीसीत युवकाचा निर्घृण खून

मेहकर : मेहकर तालुक्यातील एमआयडीसी परिसरात एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना ४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा खून प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे.
मृत युवकाचे नाव राहुल बाजड असे असून तो मूळचा मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. काही वर्षांपासून तो वाशीम जिल्ह्यातील केनवड येथे मामाकडे राहत होता. तेथे त्याने कापडाचे दुकान सुरू केले होते व व्यवसाय करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी राहुलला मेहकर शहराजवळील खंडाळा एमआयडीसी परिसरात नेले. तेथे त्याच्यावर दगडाने वार करून त्याचा चेहरा ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. ही घटना ४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार, एपीआय संदीप बिरांजे, एपीआय जारवाल, पोहेकॉ लक्ष्मण कटक व मोहम्मद परसुवाले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, या हत्येमागे प्रेमप्रकरणातून वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अधिक तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!