पिंपळगाव सराई : – ढासळवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले संतोष दळवी हे घरी परतले नाहीत, त्यानंतर शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे सहा वाजता स्वतःच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. ग्रामस्थांच्या मदतीने शेत परिसरात शोध घेण्यात आला. रात्री उशिरा शेताच्या मध्यभागी त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक पाहणीत त्यांच्या तोंडावर व पायावर जखमा दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून पोलिस तपास सुरू आहे.
