बुलढाणा :- शहरात बंद घरांना लक्ष्य करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत चोरास बुलढाणा शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शेख अरबाज ऊर्फ ‘मेमरी’ शेख मेहमुद (वय २५) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मलकापूर रोड परिसरातील सचिन खिल्लारकर यांच्या निवासस्थानी ३ फेब्रुवारी रोजी काही वेळासाठी घर बंद असताना अज्ञात चोरट्याने अवघ्या अर्ध्या तासात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर बुलढाणा शहर पोलिसांनी तपास अधिक तीव्र करत गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय केले. संशयित हालचालींच्या आधारे खामगाव रोड परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत आरोपीने सदर घरफोडीची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून ३१,५०० रुपये रोख, सुमारे ३२,६३० रुपयांच्या चांदीच्या वस्तू, एक मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील तपासात आरोपीच्या सहभागातून आणखी दोन घरफोडी व एका दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
