मलकापूर रोडवरील चोपडा शोरूम मागील रहिवासी भागात दिवसाढवळ्या घरफोडी; १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

बुलढाणा : शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, भरदिवसा घरफोडी करून तब्बल १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. मलकापूर रोडवरील चोपडा शोरूम मागील रहिवासी भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, चोरट्यांची वाढती हिम्मत पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

याप्रकरणी सचिन शंकर शिल्लारकर (वय ३५, रा. बुलढाणा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिल्लारकर हे चहाच्या हॉटेलचा व्यवसाय करतात. तक्रारीनुसार, ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामासाठी आपल्या हॉटेलवर गेले होते. घरातील इतर सदस्य नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले असल्याने घर पूर्णतः बंद होते.
सायंकाळी घरी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. आत प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील लॉकर फोडलेला दिसून आला. त्यामधून ५१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच १ लाख ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या घरफोडी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!