Headlines

आईच्या अश्रूंना शेवटी मुलाने दिलं उत्तर; दारुड्या पित्याच्या अमानुष त्रासाचा घेतला जीवघेणा बदला, खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “आई रोज रडायची… बापाच्या शिव्या-माराच्या धिंगाण्याला कंटाळून तिने खूपदा जग सोडायची तयारी केली होती… पण एकुलत्या एक मुलाने तिचे अश्रू पाहिले आणि शेवटी वडिलांचाच जीव घेतला.” लोणी गुरव (ता. खामगाव) येथे २९ एप्रिलच्या रात्री घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. गोरख धोंडोपंत हिवराळे (५५, रा. मुळ बोथाकाजी) हे आपल्या पत्नी आणि एकुलत्या एक मुला धनंजय उर्फ शंकर (२५) यांच्यासोबत काही वर्षांपासून लोणी गुरव येथे वास्तव्यास होते. हे कुटुंब मोलमजुरी करून आपल्या उपजीविकेचा मार्ग चालवत होते. काही काळ पुण्यातही वास्तव्य करून परत लोणी गुरवमध्ये आले होते. गोरख हिवराळे यांना दारूचे व्यसन होते. रोजच्या रोज दारू पिऊन घरी परतल्यावर ते पत्नी आणि मुलावर शिवीगाळ व मारहाण करत असत. २९ एप्रिलच्या रात्रीही नेहमीप्रमाणे गोरख दारूच्या नशेत घरी आले आणि वाद सुरू झाला. मात्र यावेळी मात्र प्रसंग हाताबाहेर गेला. आईला मारताना पाहून संतप्त झालेल्या धनंजयने लाकडी दांड्याने वडिलांवर सपासप वार केले. डोक्यावर आणि हातापायावर गंभीर इजा झाल्यामुळे गोरख हिवराळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. रात्रीच मृतकाचा भाऊ अरुण हिवराळे (६०) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी धनंजय उर्फ शंकर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास पीएसआय राची पुसाम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. –आईच्या नशिबी आता शोक… आणि मुलाच्या वाट्याला कारावास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!