खामगाव : शहरातील चांदमारी घरकुल परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून ठेवण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणीस चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुनम सखाराम इंगळे (वय १९) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी रात्री त्या आपल्या मैत्रिणींसह जात असताना आरोपींनी रस्त्यावर बिस्तरे व बाजा टाकून अडथळा निर्माण केला होता. याबाबत जाब विचारल्याने आरोपी संतप्त झाले. त्यांनी पुनम इंगळे हिच्यावर चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रमा सरदार, जया सरदार, निशा मोरे आणि नारायण सरदार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष इटमल्लु करीत आहेत.