मलकापूर : रस्त्याच्या मधून चालत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २६ वर्षीय युवकावर लोखंडी फायटरने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना मलकापूर शहरातील मातकाम चौक परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध मलकापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील चांदीची चैन व खिशातील रोख रक्कमही हरवल्याचे तक्रारीत नमूद आहे. अनुराग अनंतराव पाटील (वय २६, रा. दुर्गा नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते मातकाम चौकातून पायी जात असताना सौरभ खिरोडकर (रा. शिवाजीनगर), लवप्रीत मेहेर (रा. वडोदा) आणि गणेश वराडे (रा. ओंकारनगर) यांनी “रस्त्याच्या मधून का चालत आहे?” असा जाब विचारत वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यावेळी सौरभ खिरोडकर याने हातातील लोखंडी फायटरने अनुराग यांच्या गालावर वार केला. तर लवप्रीत मेहेर आणि गणेश वराडे यांनी ढकलाढकली करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. ल तसेच “तुला एखाद्या दिवशी जिवे मारून टाकू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील चांदीची चैन आणि खिशातील २ हजार २०० रुपये हरवले. परिसरात शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ४७०/२०२६ नोंदवून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत.