Headlines

नांदुऱ्यात प्रवाशांच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

नांदुरा : जुन्या बसस्थानकात प्रवाशांना लवकर खाली उतरण्याची सूचना केल्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना नांदुऱ्यात घडली. या प्रकरणी एका दाम्पत्यासह तिघांविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद भास्कर कोळी (वय ४०) हे एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून, चालक जितेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्यासह अकोला-चोपडा मार्गावरील एमएच-४९-बीझेड-८७९८ या बसवर कर्तव्य बजावत होते. खामगावहून नांदुऱ्याकडे येत असताना किशोर भास्कर गवई (रा. अटाळी, ता. खामगाव) व त्यांची पत्नी बसने प्रवास करत होते.
दुपारी सुमारे ३.२० वाजता बस नांदुऱ्यातील जुन्या बसस्थानकात आल्यानंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहकाने प्रवाशांना लवकर खाली उतरण्याची सूचना केली. याचा राग आल्याने किशोर गवई, त्यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने वाहकाशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर तिघांनी मिळून विनोद कोळी यांना मारहाण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली.
या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी किशोर भास्कर गवई, त्यांची पत्नी आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!