मलकापूर ( दिपक इटणारे ) : शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणे ही आता नवी बाब राहिलेली नाही; मात्र खड्डे पडून त्यात नागरिक जखमी होईपर्यंतही प्रशासनाने डोळेझाक करणे, ही मलकापूरकरांच्या जीवाशी खेळण्याची गंभीर बाब आहे. मलकापूर बसस्थानकासमोरील एसटी बस वळण घेणाऱ्या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पडलेला भला मोठा खड्डा याच प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा जिवंत नमुना ठरला आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर हा खड्डा अक्षरशः दिसेनासा होत असल्याने अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यात आदळून पडले. काहींना डोक्याला दुखापत झाली, तर काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सुरुवातीला छोटा असलेला हा खड्डा पावसामुळे वाढत जाऊन मोठा आणि धोकादायक झाला, तरीही नगरपरिषद प्रशासनाला त्याची दखल घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. दररोज एसटी बसेस, दुचाकी, चारचाकी तसेच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावरील खड्डा नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. पावसाच्या पाण्याखाली खड्ड्याची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालक अचानक त्यात आदळत होते. अपघात घडूनही प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. विशेष म्हणजे, ज्या कामासाठी नगरपरिषद प्रशासनाची यंत्रणा आणि अधिकारी आहेत, ते काम अखेर मलकापूर बसस्थानकावरील जय बजरंग ऑटो स्टॉपच्या चालकांनी स्वतः पुढाकार घेऊन केले. नागरिकांना आणखी अपघात होऊ नयेत आणि कोणाचा जीव धोक्यात येऊ नये, या माणुसकीच्या भावनेतून ऑटोचालकांनी खड्ड्यात खडी-मुरूम टाकून तो बुजवला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली समस्या नागरिकांनीच पुढे येऊन सोडविल्याने जय बजरंग ऑटो स्टॉप चालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या घटनेने नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी प्रशासन तत्पर असते; मग नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कुठे असते? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता मलकापूरकर विचारत आहेत. नागरिकांनी खड्डा बुजवणे ही माणुसकी; पण नगरपरिषदेकडून खड्डा न बुजवणे ही निष्क्रियता! शहरातील इतर धोकादायक खड्ड्यांचीही तातडीने पाहणी करून त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा पुढील अपघाताची जबाबदारी कोणाची, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.