मलकापूर : वाकोडी फाटा ते बोदवड रोडवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि भविष्यात पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली वाकोडी ग्रामपंचायत सदस्य पराहुल राजपूत व सामाजिक कार्यकर्ते किरण फिरके यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत मंत्री महाजन यांनी प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन) यांना आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनाही निवेदन देऊन वाकोडी परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली. यावर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना वस्तुस्थितीची माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले. याशिवाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही निवेदन सादर करून वाकोडी ग्रामपंचायत हद्दीत पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती व नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती देण्यात आली. तसेच मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत नाली बांधकामास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर मंत्री गोरे यांनी प्रधान सचिव (ग्रामविकास) यांना संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली. या मागण्यांना लवकरात लवकर मंजुरी मिळून नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा वाकोडी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.