तीन चिमुकल्यांसह आई बेपत्ता; कुटुंबीयांची चिंता वाढली

खामगाव : शहरातील चांदमारी फुकटपुरा परिसरातून एका महिलेसह तिची तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोणालाही कोणतीही माहिती न देता घरातून निघून गेलेल्या चौघांचा अद्यापही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. पोलिसांनी हरवल्याची नोंद घेत शोधमोहीम सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदमारी फुकटपुरा येथील रहिवासी श्रीकृष्ण सूर्यभान गायकवाड (वय ४७) हे १० जून रोजी रात्री कामावरून घरी परतले असता त्यांची पत्नी रंजना गायकवाड (वय ४०), मुलगा पवन (वय १४), मुलगी पायल (वय १२) आणि धाकटा मुलगा आशिष (वय ९) हे घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील परिचितांकडे चौकशी केली; मात्र चौघांचाही कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर गायकवाड यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून विविध ठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे. तसेच संबंधित महिला व मुलांबाबत माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार संतोष इटमल्लू करीत असून, संबंधित महिला व तिन्ही मुलांबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ खामगाव शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!