मलकापूर : आपसातील वाद मिटवण्यासाठी नव्हे, तर पैशांच्या व्यवहारावरून एकमेकांशी भिडण्यासाठी थेट पोलीस स्टेशनचे आवारच निवडल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. शहर पोलीस स्टेशनच्या आवारातच पाच जणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गोंधळ घातल्याने पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडला. या प्रकरणी पाचही जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास फिरोज खान असलम खान, सादीकखान रशीदखान, याकुबखान रशीदखान (तिघेही रा. मालवीयपुरा, मलकापूर), सैयद मुस्ताक सैयद सुलतान (रा. पारपेठ, मलकापूर) आणि मो. नाजिश मो. इलियास (रा. मालवीयपुरा, मलकापूर) हे पाच जण मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आले होते. यावेळी त्यांच्यात आपसातील पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. पाचही जणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत पोलीस स्टेशनच्या आवारातच गोंधळ घातला. या घटनेप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे श्रीकृष्ण हरिदास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध अप. नं. ८७०/२०२६ अन्वये कलम १९४ बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचे आवारही आपसातील वादातून झालेल्या हाणामारीला अपवाद ठरले नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे.