खामगाव : भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ६६ वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. डोक्याला गंभीर दुखापत आणि पायावरून बसचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास खामगाव-चिखली मार्गावरील गारडगाव शिवारात घडली.
या अपघातात विजय उत्तमराव गवई (वय ६६, रा. लोखंडा) यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, विजय गवई हे दुचाकीने खामगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, गारडगाव शिवारातील पेट्रोल पंपासमोर खामगाव बसस्थानकातून संभाजीनगर-नागपूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची चिखलीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, विजय गवई यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर त्यांच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे लोखंडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी समाधान मरीभाऊ गवई यांच्या तक्रारीवरून एसटी बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१ व ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
