Headlines

मोकाट जनावरांचा जीवघेणा विळखा! बैलाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वनरक्षक होण्याचे स्वप्न अधुरेच

देऊळगाव राजा : मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीच्या कोंडीपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता तो नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर किती धोकादायक ठरू शकतो, याची दुर्दैवी प्रचिती देणारी घटना समोर आली आहे. बैलाच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वनरक्षक होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या या तरुणाचा प्रवास काळाने मध्येच थांबविला. पवन अंबादास इंगळे (वय २२, रा. वरुड, ता. जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन हा हाळगाव येथे शिक्षण घेत होता. शिक्षणासोबतच वनरक्षक भरतीसाठी तो कठोर परिश्रम घेत होता. वनरक्षक होऊन कुटुंबाचे स्वप्न साकार करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, नियतीच्या एका घातक प्रसंगाने त्याची सर्व स्वप्ने कायमची हिरावून घेतली. पवनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, देऊळगाव राजा शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य चौक, बाजारपेठ तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच अपघातांचा धोकाही वाढला आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहिली जाणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पवनच्या निधनाने वनरक्षक होण्याचे त्याचे स्वप्न तर अधुरे राहिलेच; पण मोकाट जनावरांच्या प्रश्नावर प्रशासनाच्या उपाययोजनांची गरजही पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *