Headlines

पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी, कपाटातील एक लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; मलकापुरात खळबळ

मलकापूर : शहरात चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरालाही सोडले नाही. जाधववाडी, नांदुरा रोड परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातील कपाटात ठेवलेले तब्बल एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, घरातील कपाटात सुरक्षित ठेवलेले दागिने गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या घरातच चोरी होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे, असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन अर्जुन बाबर (वय ३३, रा. जाधववाडी, नांदुरा रोड, मलकापूर) यांच्या घरी ही चोरी झाली. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. २ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या आईने फोन करून कपाटात ठेवलेले सोने दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर पवन बाबर यांनी घरी येऊन संपूर्ण घरात दागिन्यांचा शोध घेतला; मात्र दागिने मिळून आले नाहीत. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चार तोळ्यांची जुनी वापरती सौभाग्यवती पट्टी पोथ, त्याला अर्धगोल आकाराचे नक्षीकाम केलेले पेंडल असून त्याची किंमत अंदाजे ७० हजार रुपये आहे. तसेच एक तोळ्याची जुनी पिळ्याची अंगठी १५ हजार रुपये आणि एक तोळ्याची बॉक्स अंगठी १५ हजार रुपये, असे एकूण एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.
या प्रकरणी पवन बाबर यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक ८५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *