Headlines

मिरवणुकीत पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष; १० ते १२ जणांवर गुन्हा, खामगाव येथील घटना

खामगाव : मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गाचे उल्लंघन करीत हुल्लडबाजी केल्याचा तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी १० ते १२ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
२५ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास मिरवणूक सुरू असताना एका दुकानासमोर दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी संबंधितांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता मिरवणूक दुसऱ्या मार्गाने नेण्यात आली. त्यानंतर काही जणांनी हुल्लडबाजी केल्याचा आरोप असून, त्यामुळे पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अक्षय परदेशी (३०), तुषार चंदेल (३५), विक्की पवार (३०), वरुण ऊर्फ मॉन्टी परदेशी (२४), विशाल चंदेल (३०) यांच्यासह अन्य अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ तसेच अन्य संबंधित कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक इंगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!