शेगाव, २६ सप्टेंबर : शाळेत मुख्याध्यापकच मद्यधुंद अवस्थेत आल्याच्या तक्रारीने गोळेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली. विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन अहवाल सादर झाल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापक सुभाष गणवीर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सुभाष गणवीर हे मद्यधुंद अवस्थेत शाळेत आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर शाळा समितीच्या अध्यक्षांनी त्यांना शाळेतून परत पाठविल्याचे सांगण्यात आले. त्याच दिवशी सहाय्यक शिक्षक रजेवर असल्याने शाळेतील अध्यापन व्यवस्थेवरही परिणाम झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या प्रकारानंतर काही ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली. या घटनेची वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाने प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली. गटशिक्षणाधिकारी सागर गारोडी यांच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख प्रफुल्ल भोंडे आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) नागरे यांनी गोळेगाव बु. येथील शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांकडून संबंधित घटनेबाबत माहिती घेण्यात आली. चौकशीअंती तयार करण्यात आलेला अहवाल पंचायत समितीच्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला. चौकशीदरम्यान घटनेशी संबंधित विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. तसेच पत्रकार देवचंद्र समदूर यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणाच्या ध्वनिमुद्रणासह उपलब्ध पुराव्यांचाही विचार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय पत्रकार तसेच पालकांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या तक्रारींचाही चौकशीदरम्यान उल्लेख झाल्याची माहिती आहे. चौकशी अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पंचायत समिती शेगावचे गटविकास अधिकारी सुरेश तायडे व गटशिक्षणाधिकारी सागर गारोडी यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक सुभाष गणवीर यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे गोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळेतील संबंधित प्रकरणाला आता प्रशासकीय पातळीवर वेगळे वळण मिळाले आहे.