शेगाव : दुपारी झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून एका तरुणासोबत रात्री वाद घालत त्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास सप्तश्रृंगी शाळेजवळ, खामगाव रोड परिसरात घडली. याप्रकरणी संकेत संजयराव जाधव (देशमुख), वय २५, रा. रोकडिया नगर, शेगाव यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संकेत जाधव हे सोनू देशमुख यांच्यासोबत सप्तश्रृंगी शाळेच्या बाजूला बसलेले असताना गौरव बळीराम झाडोकार, रा. पातुर्डा खुर्द, ता. संग्रामपूर हा तेथे आला. त्याने ‘तू मला दुपारी शिवीगाळ का केली?’ असे म्हणत संकेत यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर गौरव याने शिवीगाळ करत संकेत यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी पडलेला दगड उचलून संकेत यांच्या डोक्यात मारला. दगडाचा मार लागल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी गौरव बळीराम झाडोकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गाडगे करीत आहेत.