Headlines

उधारीवर किराणा देण्यास नकार; दुकानदाराला लोखंडी पाईपने मारहाण, उधारी वाढल्याचा राग; दोघांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा

मलकापूर : किराणा दुकानातील उधारीची रक्कम वाढल्याने पुढे उधारीवर सामान देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दुकानदाराला दोघांनी लोखंडी पाईप व लाकडी डंबेल्सने मारहाण करून जखमी केल्याची घटना वरखेड येथे घडली. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऋषीकेश अरुण हिंगे (वय २१, रा. वरखेड, ता. मलकापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, तुषारसिंह सुरेंद्रसिंह राजपूत (वय २२) हा हिंगे यांच्या किराणा दुकानातून उधारीवर सामान घेत होता. मात्र, त्याच्याकडील उधारीची रक्कम अधिक झाल्याने हिंगे यांनी त्याला पुढे उधारीवर किराणा सामान देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तुषारसिंह राजपूत व मनोजसिंह शिवपालसिंह राजपूत, दोघेही रा. वरखेड, यांनी संगनमत करून हिंगे यांच्याशी वाद घातला. ‘उधारीवर सामान का देत नाही?’ असे म्हणत दोघांनी लोखंडी पाईप व लाकडी डंबेल्सने मारहाण केली. या मारहाणीत हिंगे जखमी झाले. तसेच आरोपींनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी हिंगे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी तुषारसिंह राजपूत व मनोजसिंह राजपूत यांच्याविरुद्ध अप.क्र. १८८/२०२६ नुसार कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीट अंमलदार पदवीधर पोलीस शिपाई सुभाष सरकाटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!