मलकापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेत रस्त्यांसह रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या कामांना गती देत उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य व प्रशासकीय कार्यक्षमता दाखविणाऱ्या मलकापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांच्या उल्लेखनीय कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. सन २०२५-२०२६ या कालावधीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून, या सन्मानामुळे मलकापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याचीही राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील (स्थापत्य) सहायक अभियंता श्रेणी-१ सचिन निवृत्ती तायडे यांची या वैयक्तिक सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यभरात रस्ते, पूल, विविध शासकीय इमारती तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे केली जातात. या कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संगणकीय संकल्पनाचित्रे, विद्युतीकरण तसेच विविध क्लिष्ट तांत्रिक बाबींचे नियोजन करून प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा शासनाकडून गौरव केला जातो. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्कारासाठी इंजि. सचिन तायडे यांची झालेली निवड ही त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरीची शासनाकडून झालेली पावती मानली जात आहे. इंजि. सचिन तायडे यांनी आपल्या कार्यकाळात विशेषतः शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या सुविधेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. शेत रस्त्यांची कामे तांत्रिक तसेच प्रशासकीयदृष्ट्या किचकट आणि वेळखाऊ असल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, तायडे यांनी ही कामे केवळ प्रशासकीय जबाबदारी न मानता शेतकऱ्यांच्या सेवेशी जोडून त्यांचे योग्य नियोजन केले आणि अनेक शेत रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेली. त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही शेत रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर असून, अनेक कामे प्रस्तावितही आहेत. त्याचबरोबर रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून एकमेकांपासून दुरावलेल्या अनेक गावांना जोडण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागले. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास या कामांचा फायदा झाला आहे. विविध शासकीय इमारतींच्या बांधकामांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात गती मिळाली असून, अनेक इमारतींची कामे पूर्णत्वास गेली आहेत, तर काही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. तांत्रिक बाबींची जाण, कामांचे प्रभावी नियोजन, प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर विविध कामे मार्गी लावल्याने इंजि. सचिन तायडे यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी-कर्मचारी तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.