Headlines

नोकरीच्या आमिषाने तब्बल २० लाख ७४ हजारांची फसवणूक; बनावट बँक कागदपत्रे तयार केल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा, मलकापूर शहरातील घटना

मलकापूर : कंपनीत मुलगा आणि जावयाला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध व्यक्तींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार मलकापूर शहरात समोर आला आहे. नोकरीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दिलेली रक्कम परत मागितल्यानंतर बनावट बँक कागदपत्रांच्या माध्यमातून व्यवहार खरा असल्याचे भासविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल २० लाख ७४ हजार १४० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, मलकापूर शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मधुवन नगरातील मंदाबाई विलास झनके यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, मुश्ताक अब्दुल रहमान हरपन्हाळे, अनिता हरपन्हाळे, अमजद खान आणि डॉ. खान यांनी २४ ऑगस्ट २०२२ ते ३ मे २०२३ या कालावधीत कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विविध व्यक्तींकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहारात बँकेकडून घेतलेल्या ५ लाख ४० हजार रुपयांसह भारत बोदवडे, तायडे, विनोद सपकाळे, योगेश आगळे आणि कौतिक सुरवाडे यांच्याकडूनही रक्कम घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधितांकडून नोकरीबाबत आश्वासन देऊन पैसे स्वीकारण्यात आले. मात्र, त्यानंतर अपेक्षित नोकरी न मिळाल्याने पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली. रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींनी बँकेची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!