Headlines

विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह; पिंप्रीगवळी शिवारातील घटना; मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार

पिंप्रीगवळी : शेतातील विहिरीजवळ आलेल्या दुर्गंधीचा शोध घेतल्यानंतर विहिरीत कुजलेल्या अवस्थेत नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने पिंप्रीगवळी शिवारात खळबळ उडाली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे गूढ शवविच्छेदन अहवालानंतरच उकलणार आहे.

शेतकरी राजेंद्र भगवान पवार हे सकाळी दहाच्या सुमारास शेतात गेले होते. त्यावेळी विहिरीजवळ त्यांना तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यांनी विहिरीत पाहणी केली असता पाण्यात बिबट्याचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुनील भामद्रे यांनी पोलिस, महसूल व वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच मोताळा वन विभागाचे पथक तसेच शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. मात्र बिबट्या विहिरीत नेमका कसा पडला, त्याचा मृत्यू अपघाती झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!