मलकापूर : पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधत मलकापूरातील गजानन नगरी परिसरात बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक तिज उत्सव मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवात धार्मिक विधी, पारंपारिक पूजा, भजन-कीर्तन, लोकगीते आणि नृत्याच्या माध्यमातून बंजारा समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवायला मिळाली. उत्सवाच्या काळात बंजारा समाजातील महिला व तरुणींनी आकर्षक आणि नयनरम्य पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. पारंपारिक लोकनृत्य आणि गीतांच्या तालावर संपूर्ण परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. उत्सवाच्या आठव्या दिवशी रात्री विशेष तिज पूजन करण्यात आले. यावेळी राधा-कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर महिलांनी पारंपारिक भजने, लोकगीते आणि नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली. बंजारा समाजातील तिज उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून निसर्गपूजा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. पिढ्यानपिढ्या जपली जात असलेली ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जात असल्याचे या उत्सवातून दिसून आले. नऊ दिवसांच्या उत्सवानंतर रविवारी सायंकाळी पारंपारिक रितीरिवाजानुसार तिज उत्सवाची सांगता करण्यात आली. शेवटच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पारंपारिक पद्धतीने तिज विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
नृत्य करतांना महिला
सोहळ्याला मलकापूर येथील नायक, कारभारी यांच्यासह महिला, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा हा तिज उत्सव मलकापूरकरांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरला.