मोताळा : शहरातील पाचपीर दर्गा परिसरात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदेशीर विक्रीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ६ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आलेल्या धडक कारवाईत १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची किंमत ५८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोताळा शहरातील पाचपीर दर्गा परिसरात गांजाची अवैधरित्या विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परिसरात अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेख साहिल शेख रफिक (वय १९, रा. पाचपीर दर्गाजवळ, मोताळा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५० हजार रुपये प्रति किलो दराने एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचा १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात शेख साहिल याच्याविरुद्ध अप. क्र. ४३४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.