मलकापूर : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने बाजीप्रभूनगर येथील परिसराला पी.एस.आय. जाधव यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत चोरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. घर किंवा दुकान बंद करून बाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्य आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे, असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. नागरिकांनी आपल्या परिसरात जागरूक राहून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मलकापूर शहरातील विविध चौक व परिसरांमध्ये कॉर्नर सभा, नागरिकांशी थेट संवाद आणि विविध माध्यमांतून जनजागृती करून पोलिसांकडून सुरक्षिततेचा संदेश दिला जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत आहे.