मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवरील संस्कृती फॅशनसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय वृद्धाला अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव वेगात धडक दिल्याची घटना गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वृद्धाचा उजवा पाय गंभीर जखमी होऊन फ्रॅक्चर झाला असून, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेत आनंदा लक्ष्मण करांडे (वय ७८, रा. हरनखेड) हे बुलढाणा रोडवरील संस्कृती फॅशनसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे करांडे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. त्यानंतर जखमी आनंदा करांडे यांना उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.